top of page
Temple

विश्व ​मंदिर परिषद

हिंदू मंदिरांची आणि भक्तांची वैश्विक संघटना 

taprohmtemple_edited.jpg
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।
Swami Govinddev Giri.png

आशीर्वाद

प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज

Kshitij Patukale.png

संकल्पना व संयोजक
प्रा. क्षितिज पाटुकले 

संकल्पना :

पवित्र भारतभूमी मंदिरे, देऊळे - राऊळे यांचे आगर आहे. श्रद्धा, भक्ती आणि आस्तिकभाव भारतीयांच्या उज्वल जीवनप्रणालीचा आत्मा आहे. सनातन वैदिक संस्कृतीचा पवित्र, सशक्त गंगौघ हजारो वर्षे निरंतर प्रवाहित आहे, त्यात मंदिरे, देवस्थाने आणि तीर्थक्षेत्रांचा मोलाचा वाटा आहे. यामुळेच हजारो वर्षे वारंवार होणाऱ्या आक्रमणानंतरही भारतीय संस्कृती टिकून आहे. खेड्या-पाड्यातील लहानमोठया मंदिरांचे तेथील इतिहास,  संस्कृती, पौरूष, पराक्रमाशी अतूट नाते आहे. सद्यस्थितित बहुतेक मंदिरे उदात्त शौर्याची प्रेरणादायी गाथा सांगत उभी आहेत. मंदिरे – धर्म, संस्कृति, समाज, इतिहास, परंपरा, आदर्श, संस्कार, नीतिमत्ता, शाश्वत जीवनमूल्ये यांचे प्रत्यक्ष वस्तुपाठ देणारी शक्तिपीठे आहेत. वैदिक धर्माच्या तात्विक छत्रछायेखाली प्रशस्त आणि भक्कम पायावर विचारांचे अभिसरण करणारी ज्ञान, विज्ञान, शिक्षण, संस्कार, मनोरंजन आणि अनुभूती यांचा अक्षय ठेवा मुक्तपणे सर्वांपर्यंत पोहोचवणारी मंदिरे ही संस्कारालयेच होती. समाजाच्या सर्वस्तरातील घटकांना नि:संकोचपणे समाविष्ट करून घेऊन त्यांना कार्यप्रवण करणारी आणि समाज जीवनाचे संतुलन राखणारी एक निकोप व्यवस्था या मठ-मंदिरातून दीर्घ-काळपर्यंत सुव्यवस्थितपणे जतन केलेली होती. निसर्ग, समाज, संस्कृती, शिक्षण, उत्सव, पर्यावरण, इ. घटकांची नाळ सर्वांशी जोडणारी, त्यांना आधार देणारी आणि सामावून घेणारी निसर्गस्नेही व्यवस्था मंदिर व्यवस्थापनात यशस्वीरीत्या कार्यरत होती. मंदिरे म्हणजे व्यष्टि आणि समष्टी म्हणजे व्यक्ति आणि समाज यांना जोडणारी प्राचीन व्यवस्था होती. धर्मशाळा, भक्त निवास, वेद पाठशाळा, नृत्यशाळा, गायनशाळा, यज्ञमंडप, यज्ञशाळा, गोशाळा, देवराई, नक्षत्र वने, धन्वंतरी वाटिका अशा सुसंपन्न वैविध्याने मंदिरे सज्ज असत. मंदिरे पांथस्थांचे विश्रांतीस्थान, भाविकांचे श्रद्धास्थान, कलाकारांचे स्फूर्तिस्थान आणि विद्वान-पंडित-याज्ञिकांचे आश्रयस्थान असत. मंदिरे समृद्ध संस्थाने होती, ज्ञानदान करणारी ज्ञानपीठे होती. समाजाला सुदृढ बंधनाने जोडून ठेवणारी कार्यालये होती, समाजाचा श्वास होती, स्वायत्त मंदिरे समाजाचे हृदय होती. 

काळाच्या ओघात भारतीय संस्कृती बरोबरच या देवस्थानांवर किंवा मंदिरावर चहूबाजूंनी, आतून – बाहेरुन, बौद्धिक – कौटुंबिक - सामाजिक पातळीवर नृशंस आक्रमणे झाली आणि समाजमनाला निकोप आणि उमदे राखणारी ही समाजहृदय असलेली मंदिरे दुर्बल झाली, विपन्नावस्थेला प्राप्त झाली, समाज जीवनापासून अलग झाली. त्यामुळे समाज निष्क्रिय – निद्रावश झाला. मंदिराच्या निष्प्राण वास्तू कशाबशा तग धरुन राहिल्या. धर्मशाळा नष्ट झाल्या. सेवाभाव संपुष्टात आला आणि भौतिकवादाच्या थैमानात मंदिरव्यवस्था लयाला गेली. तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधणारी, एकमेकांना आधार देणारी व्यवस्था नष्ट झाली. हिंदू देवस्थाने एकाकी पडली. शिखांच्या गुरुद्वारांच्या व्यवस्थापनासाठी शिरोमणी प्रबंधक समिती तर मशिदींच्या व्यवस्थापनासाठी वक्फ बोर्ड आहे. जैन, ख्रिश्चन, इत्यादिंच्या, प्रांतिय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या संघटना आहेत. फक्त हिंदु देवस्थानेच असंघटीत आहेत. विविध संघटनांच्या मार्फत थोडा प्रयत्न होताना दिसतो परंतू त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. परस्परांना मदत करून, व्यापक हिताच्या दृष्टीने एकत्र येऊन, सरकार दरबारी किंवा समाजामध्ये आपली बाजू मांडण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

 

     भारतातील व भारताबाहेरील हिंदू मंदिरे परस्परांशी सौहार्दाने संलग्न झाली पाहिजेत. परस्परात सुसंवाद साधला पाहिजे, त्यांच्यात एक समान भूमिका व सूत्र जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या उद्देश पूर्ततेसाठी विश्व मंदिर परिषदेची स्थापना करण्यात येत आहे. संपूर्ण विश्वासाठी हा काळ संक्रमणाचा आहे. हिंदु मन आणि समाज हजारो वर्षांची मरगळ टाकून पुन्हा चैतन्याच्या शोधात जागृत होत आहे. या शुभ समयी प.पू. स्वामी महाराज, अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ, निवृत्त न्यायाधीश, विविध मंदिरांचे विश्वस्त, निवृत्त उच्च अधिकारी, इ. अनेक व्यक्तीनी एकत्र येवून विश्व मंदिर परिषदेची स्थापना केली आहे.
 

विश्व मंदिर परिषद

संपर्क/ व्हॉटसअप : 7066250362 

622, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे - 411004 

  • Grey Instagram Icon
  • Grey YouTube Icon
  • Grey Facebook Icon

धन्यवाद 

©2025 by Vishwa Mandir Parishad

bottom of page